तुलसी वृंदावन ज्याचे घरी I त्यासी प्रसन्न श्रीहरी II
असं म्हटलं जातं. तुळशीचं एक पानही त्रैलोक्यासमान आहे असं संत एकनाथ म्हणतात. दिवाळीनंतर वृंदावनाला जागा नसली तरी छोट्या मोठ्या कुंडीत तुळशीचं रोप लावलं जातंच. तुलसी विवाहाच्या निमित्तानं पुन्हा एकदा तुळशीचं महात्म्य सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे.
पाण्यापासून होणारे रोग कमी करण्यासाठी या तुळशीचा वापर आयुर्वेदात केला जातो म्हणून सतत पाण्यात राहणार्या शेषशायी विष्णूंना तुळस अधिक प्रिय असावी. आता एकविसाव्या शतकात केवळ धर्म किंवा धार्मिक श्रध्दा म्हणून तुळशीकडे न पाहता तिचं 'आरोग्य दायिनी' हे स्वरुप लक्षात घ्यायला हवं.
पूर्वजांनी तुळशीला सकाळी उठून नमस्कार करण्यास सांगितलं. हे का करायचं याचं उत्तर आयुर्वेदात मिळत तुळस आणि कडुनिंब ही अशी झाडं आहेत ज्यात कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन अधिक प्रमाणात बाहेर सोडला जातो. तुळशीच्या रोपाच्या ५० मीटर परीघातली हवा अत्यंत शुध्द राहते. या क्षेत्रात ऑक्सिजनचं प्रमाण तुलनेनं जास्त असल्यानं घरात पिसवा, हिवताप किंवा अन्य साथीच्या रोगांचे जंतू शिरत नाहीत. सकाळी तुळशीजवळ गेल्यास सर्वाधिक शुध्द हवा शरीराला मिळते आणि दिनचर्या सुरु करतानाच भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला होतो.
सध्या सतत प्रदूषण वाढत आहे. स्वाईन फ्लू सारख्या नवनवीन साथीच्या रोगांनी लोक त्रस्त आहेत. त्यामुळे मुंबई पुण्यासारख्या शहरांमधून खरंतर तुळस अधिक लावली जाणं महत्वाचं आहे. सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हितकर आहे.