प्रख्यात शास्त्रज्ञ व अणूउर्जा आयोगाचे अध्यक्ष विक्रम साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ रोजी केवळ राज्यात तिरुअनंतपूरम जवळील कोवाळम येथे झाला. विक्रम साराभाई यांची रहाणी कमालीची साधी होती. साराभाई परिवार प्रचंड श्रीमंत होता.त्यांचे राहते घर सुद्धा राजवाड्यासारखे होते. विक्रम साराभाई मात्र साधेपणाने रहात असत.श्रीमंतीचा बडेजाव त्यांना आवडत नसे. 'साधी रहाणी उच्चविचारसरणी' या उक्तीचा ते चालता बोलता आदर्श होते.
अहमदाबादच्या भौतिक संशोधन प्रयोगशाळेचे संचालक म्हणून काम करत असताना घडलेला हा प्रसंग. ते कडक उन्हाळ्याचे दिवस होते.सूर्य आग ओकत होता.सर्वांना थंडावा हवा होता.पण उन्हाळ्यामुळे मिळत नव्हता. अशा तप्त वातावरणात विक्रम साराभाई आपल्या कार्यालयात काम करत होते. डोक्यावर पंखा फिरत होता पण थंडावा नव्हता. घामाच्या धारा वहात होत्याच. तरीही विक्रम साराभाई तन्मय होऊन काम करत होते.
तेवढ्यात एक व्यक्ती त्यांच्या कार्यालयात आली. दोघांच्या कामासंबंधी बोलणे झाले. जाता जाता ती व्यक्ती बोलली."सर एक विचारु?"
"विचारा"
"सर एवढा उकाडा आहे. तरीही तुम्ही काम करत आहात. तुमचे स्वास्थ्य, वेळ फार मोलाचे आहे,अशा जळत्या भट्टीत तुम्ही काम कसे करता?
"उन्हाळा काय मला एकट्यावर आहे" विक्रम साराभाई बोलले.
"नाही सध्या उन्हाळ्याने कहर केलाय, पण तूम्ही...." ती व्यक्ती बोलली.
"पण काय? साराभाईंनी विचारले.
"तुमच्या कचेरीला वातानुकुलीत यंत्र का बसवून घेत नाही?"
साराभाई हसले " हे पहा उन्हाळा कडक आहे हे खरं, पण तो काय मला एकट्यालाच आहे.तुम्हालाही आहे आणि माझ्या कार्यालयात काम करणार्या प्रत्येक व्यक्तीला उन्हाळा आहे."
"मग?"
मला सांगा जो पर्यंत मी त्या सर्व कर्मचारी बंधूंचा प्रमुख म्हणून त्यांच्यासाठी वातानुकुलन यंत्राची सोय करुन देत नाही तो पर्यंत मी मला वातानुकुलन यंत्राचा वापर करण्याचा अधिकार आहे का? साराभाईंनी प्रश्न केला.
विक्रम साराभाईंचे निधन ३० डिसेंबर १९७१ रोजी झाले. श्रीमंत घरात जन्मलेले मनानेही कायम श्रीमंतच राहीले. आपल्या साध्या रहाणीतून उच्च विचारांचे दर्शन ते असे वेळोवेळी घडवत राहीले.