लहान मुलांच्या आयुष्यात पोहणं या गोष्टीबद्दल कुतूहल, भीती, आकर्षण अशा मिश्र भावना असतात. पण उन्हाळ्याच्या सुट्टीतले पोहण्याचे वर्ग जी मुलं मजा अनुभवतात ते ती आयुष्यभर विसरत नाहीत. पोहायला शिकणं हे कोणाच्याही आयुष्यात महत्त्वाचं नैपुण्य आहे. लहानपणीच ते आत्मसात करता येणं उत्तम. अनेकजणांना समुद्रकिनार्याचं आकर्षण असतं. समुद्रात उतरुन लाटांशी खेळावं, त्यांवर स्वार व्हावं वाटतं पण पोहता येत नसल्यामुळे एकप्रकारची पाण्याची भीती मनात असते. खरंतर पोहणं ही नैसर्गिक गोष्ट मनुष्यासाठी असावी. जन्माआधीचे ९ महिने आपण आईच्या पोटात पाण्यातच असतो आणि हा आपला जलस्पर्शाचा सर्वात प्रथम अनुभव ! पोहणं शिकण्याकरिता चांगला शिक्षक शोधणं जरुरीचं असतं. या शिक्षकावर विश्वास हवाच हवा.शिक्षकांशी संवाद असणंही विश्वासाएवढंही महत्त्वाचं आहे.कारण पोहण्यातलं नैपुण्य आपण त्यांच्या मार्गदर्शनानुसार आत्मसात करतो. पोहण्याचे आरोग्यावर होणारे परिणाम सर्वज्ञात आहेत शिवाय जोडीला एका वेगळ्याच प्रकारचा आरामदायक अनुभव मिळतो तो विरळाच.पोहण्याने कॅलरीज खर्च होतात, शरिराला सर्वांगाने व्यायाम मिळतो. शरिरबांधा नियमित पोहण्याने सुडौल होतोच शिवाय मनावरचा ताण हलका होत असल्याचं पोहताना जाणवतं. जलस्पर्श हा त्वचेला सुखदायी अनुभूती देत मनालाही प्रसन्न करतो याचं कारण कदाचित आईच्या पोटातल्या नऊ महिन्यांच्या वास्तव्यात दडलं असावं. आतातर नुकत्याच जन्मलेल्या बाळांनाही स्विमिंगपूलमध्ये शिकवलं जातं. ' Out of the womb - into the pool' अशी विचारधारा आईबाबांची असावी असं म्हणतात. बाळाच आणि त्याच्या आईबाबांचं नातं स्विमिंगपूलमध्ये आणखीनच छान होतं असं काही अभ्यासक म्हणतात. |