sachinbhandare - तरुणांनो, चला, जिंकू या दाही दिशा...
 

Contact
sachin
time pass
marathi newspaper
websites
Career
=> दहावीनंतरचे डिप्लो
=> शैक्षणिक कर्जासाठी
=> दहावी, बारावी, पदवीधरांसाठी सुरक्षा दलात ह
=> युपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षा
=> तरुणांनो, चला, जिंकू या दाही दिशा...
आरोग्य
बँकिंग

देशात एकाच वेळी सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएएसएफ), सशस्त्र सीमा बल (एसएसबी), आसाम रायफल्स आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दल (आयटीबीपी) या निमलष्करी दलामध्ये कॉन्स्टेबल (जनरल डय़ुटी) च्या ५२,५४३ पदांची प्रथमच मोठी भरती होत आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून होणाऱ्या या भरती प्रक्रियेची ‘लोकसत्ता करिअर काऊन्सेलर’च्या युवा वाचकांना माहिती देणारा हा लेख.
देशाच्या सीमावर्ती भागात अहोरात्र पहारा देत परकीय शक्तींविरुद्ध लढणारे सीमा सुरक्षा दलाचे जवान असोत किंवा हिमालयाच्या हजारो फूट उंचीवरच्या पर्वत रांगेत उणे ४० अंश सेल्शियस तापमानात दक्ष राहून देशाची सुरक्षा करणारे इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस असोत.. धाडस, कणखरपणा आणि चिकाटी त्याला समाजसेवेची जोड देऊन देशसेवेसाठी समर्पित भावनेने काम करणारे सुरक्षा दलातील जवान आजच्या लाखो तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. याच प्रकारे इतरांचे प्रेरणास्थान बनण्याची संधी केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातल्या हजारो तरुणांना उपलब्ध करून दिली आहे.
भारत सरकार (कार्यप्रणाली) नियम १९६१ अंतर्गत गृह मंत्रालयाच्या विविध प्रभागांमध्ये प्रशासन, समन्वय आदींबरोबरच पोलीस विभाग असून त्यात सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), सशस्त्र सीमा बल (एसएसबी), आसाम रायफल्स आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दल (आयटीबीपी) या निमलष्करी दलांचा समावेश होतो. सीमा भागात राहणाऱ्या लोकांचे संरक्षण करणे, सीमा भागातील घुसखोरी, गुन्हेगारी रोखण्यासह या भागातील लष्करी आणि अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्याचे कार्य सीमा सुरक्षा दल करीत असते. सीआरपीएफ हे देशातील एक महत्त्वाचे सशस्त्र दल आहे. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचं कार्य हे दल करते. विविध राज्यातील विविध पोलीस सेवांसाठी सीआरपीएफचा उपयोग केला जातो. राष्ट्रीय अर्थव्यवस्था बळकट 
करण्यासाठी खासगी क्षेत्राचे महत्त्व ओळखून खासगी उद्योगधंद्यांना शासनाने प्राधान्याने सुरक्षा पुरवली आहे. औद्योगिक आस्थापनांना गरजेप्रमाणे सुरक्षांचे पर्याय पुरविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कार्यरत आहे. उत्तर-पूर्व आणि इतर क्षेत्रातील बंडखोरांविरुद्ध मोहिमा राबवून परिसरात शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी आसाम रायफल्सवर आहे. त्याशिवाय भारत-चीन, भारत-म्यानमार सीमांवर सुरक्षा देण्याचं काम हे दल करते. लद्दाखच्या काराकोरम येथून अरुणाचल प्रदेशच्या दिफू लापर्यंत सुमारे ३४८८ किलोमीटर लांब भारत-नेपाळ-चीन त्रिसंगमापर्यंत भारत-तिबेट सीमा सुरक्षेसाठी भारत-तिबेट सीमा पोलीस दलाची निर्मिती करण्यात आली. सीमा क्षेत्रातील घुसखोरी रोखण्यासह तस्करी आणि इतर गुन्ह्यांना प्रतिबंधासाठी जनतेच्या सुरक्षेसाठी सशस्त्र सीमा बल कार्यरत आहे.
केंद्रीय पोलीस संघटनांमध्ये कॉन्स्टेबल हा एक महत्त्वाचा घटक आहे. या संघटनेत सर्वच स्तरावर परिणामकारक, प्रभावीपणे काम करण्याची मोठी जबाबदारी या घटकावर असते. त्यामुळे सुदृढ, योग्यता आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या तरुणांसाठी केंद्रीय पोलीस संघटनेतील करियर स्वत:ला सिद्ध करून दाखविण्यासाठीची मोठी संधी आहे.
कॉन्स्टेबल (जनरल डय़ुटी)
० पात्रता    :    दहावी इयत्ता उत्तीर्ण
० वेतनश्रेणी    :    ५२००-२०२०० + ग्रेड पे रुपये २००० + इतर सवलती
० वयोमर्यादा    :    १८ ते २३ वर्षे (२ ऑगस्ट १९८८ ते ३१ जुलै १९९३ च्या दरम्यान जन्म असावा) अनुसूचित जाती/ जमातीसाठी ५ वर्षे तर इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्षे सवलत.
राज्यात ३२९१ पदांची भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून निमलष्करी दलामध्ये होणाऱ्या या भरतीत महाराष्ट्राच्या वाटय़ाला ३२९१ जागा आल्या आहेत. यात संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच राज्यातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यासाठी स्वतंत्र ३३२ जागांचा समावेश आहे. दलनिहाय भरण्यात येणाऱ्या पदांची माहिती :
सशस्त्र सीमा बल, आसाम रायफल्स आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलात फक्त पुरुष उमेदवारांना निवडले जाणार आहे.
निवड प्रक्रिया : केंद्रीय पोलीस संघटनांमध्ये होणाऱ्या या भरतीसाठी उंची, धावण्याची शर्यत, शारीरिक दर्जा चाचणी, शारीरिक योग्यता चाचणी, लेखी परीक्षा आणि नंतर वैद्यकीय चाचणीनंतर यशस्वी उमेदवारांना पर्यायानुसार केंद्रीय पोलीस संघटनेतील या दलांमध्ये सामावून घेतले जाणार आहे.
शारीरिक दर्जा चाचणी : अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना शारीरिक दर्जा चाचणीसाठी प्रारंभी बोलावले जाईल. यात उंची तपासली जाईल. पुरुषांसाठी १७० सें.मी. तर महिलांसाठी १५७ सें.मी. उंची तर पुरुषांना छाती न फुगविता ८० सें.मी. आणि ५ सें.मी. फुगविता येणे आवश्यक आहे. पुरुष-महिला उमेदवारांचे उंचीच्या प्रमाणात वजन पाहिजे. उंची आणि छातीच्या पात्रतेत अनुसूचित जमाती आणि उत्तर-पूर्वेकडील राज्याच्या उमेदवारांना सवलत दिली गेली आहे. उंचीमध्ये पात्र ठरलेल्या पुरुष उमेदवारांना ५ कि.मी. तर महिला उमेदवारांना १.६ कि.मी. अंतर अनुक्रमे २४ आणि साडेआठ मिनिटांत धावण्याच्या शर्यतीत पार पाडावे लागेल.
शारीरिक योग्यता चाचणी : शारीरिक दर्जा चाचणीत निवडलेल्या उमेदवारांची शारीरिक योग्यता चाचणी घेतली जाईल. त्यात पुरुषांकरिता लांब उडी-११ फूट, उंच उडी- साडेतीन फूट तर महिला उमेदवारांकरिता लांब उडी-९ फूट, उंच उडी-३ फूट या चाचण्यांचा समावेश असेल. याकरिता प्रत्येकी ३ संधी दिल्या जातील. माजी सैनिकांसाठी ही चाचणी लागू नाही.
लेखी परीक्षा : वरील दोन्ही चाचण्यांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची दि. ५ जून २०११ रोजी लेखी परीक्षा घेतली जाईल. १०० गुणांची १०० प्रश्नांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची दोन तासांची ही परीक्षा असेल. त्यात जनरल इंटेलिजन्स अ‍ॅण्ड रिझनिंग, जनरल नॉलेज अ‍ॅण्ड जनरल अवेरनेस, इलेमेन्ट्री, मॅथेमॅटिक्स, इंग्रजी किंवा हिंदी अशा चार भागांचा समावेश असेल. प्रत्येक भाग हा २५ प्रश्नांचा २५ गुणांचा असेल. चौथ्या भागात इंग्रजी किंवा हिंदी यापैकी एक भाषा निवडता येईल, तर उर्वरित तीन भागांच्या प्रश्नपत्रिका या हिंदी किंवा इंग्रजीत असतील.
लेखी परीक्षेचे सविस्तर स्वरूप :  जनरल इंटेलिजन्स अ‍ॅण्ड रिझनिंग- यात विश्लेषणात्मक पद्धती, कल आणि योग्यता चाचणी तपासली जाते. या भागात भिन्न गोष्टींमध्ये असलेली साम्यता, फरक, भेद, निरीक्षण, नातेसंबंधांच्या संज्ञा, अंकगणितीय तर्कशक्ती आणि संख्यांचे वर्गीकरण, अंकगणिती संख्यांची मालिकी, सांकेतिक-असांकेतिक शब्द इत्यादी घटकांचा यात समावेश असतो.
जनरल नॉलेज अ‍ॅण्ड जनरल अवेरनेस- सभोवताली घडणाऱ्या घटनांबद्दल उमेदवार किती चौकस आहे त्याची चाचणी करण्यासाठी विविध प्रश्न विचारले जातात. यात उमेदवारांचे चालू घडामोडी, दैनंदिन घटनांबद्दलची निरीक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबतचे ज्ञान तपासले जाते. भारत आणि शेजारील राष्ट्रांची क्रीडा, इतिहास, संस्कृती, भोगल, अर्थव्यवस्था, राजकारण, भारतीय घटना, वैज्ञानिक संशोधन आदी घटकांवर प्रश्न विचारले जातात. कोणत्याही एका शाखेशी संबंधित नसलेले मात्र सामान्य विषयांवरचे प्रश्न यात असतात.
इलेमेन्ट्री मॅथेमॅटिक्स- या घटकात संबंधित संख्या मालिकांच्या समस्या, पूर्ण संख्यांची गणना, दशांश आणि अपूर्णाक आणि त्यांचे संख्यांशी संबंध, मूलभूत अंकगणितीय प्रकार (गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज), टक्केवारी, प्रमाण, सरासरी, व्याज, नफा-तोटा, सवलत, वेळ आणि अंतर, प्रमाण वेळ, काळ आणि काम आदी प्रकारचे प्रश्न विचारले जातात.
० इंग्रजी/हिंदी- इंग्रजी किंवा हिंदी भाषेविषयी उमेदवारांची क्षमता तपासण्यासाठी या घटकात सारांश लेखन, कौशल्ये आदी प्रकारांचा समावेश असतो. ० या परीक्षेतील सर्व घटकातील प्रश्न दहावीच्या स्तरावरचे असतात. ० परीक्षा केंद्रे- अमरावती, नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक, मुंबई, कोल्हापूर, पणजी (गोवा)
वैद्यकीय चाचणी : आयोगाने निर्धारित केलेल्या लेखी परीक्षेतील गुणानुसार पात्र उमेदवारांची वैद्यकीय परीक्षा केली जाते. शारीरिक व्यंग किंवा दोष असलेल्यांना यात वगळते जाते. सपाट तळवे, गुडघे, वाकडे पाय, दृष्टीदोष, तळवा आणि बोटांमधील दोष आदी व्यंग्य असलेल्यांना वगळले जाते.
अर्ज करण्याची पद्धत
केंद्रीय पोलीस संघटनेतील कॉन्स्टेबल (जीडी) या पदासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन प्रकारे दि. ४ मार्च २०११ पर्यंत अर्ज पाठविता येतात.
ऑनलाईन- ऑनलाईन अर्ज पाठविण्यासाठी ६६६.२२ूल्ल’्रल्ली.ल्ल्रू.्रल्ल ही स्वतंत्र वेबसाइट कार्यान्वित करण्यात आली आहे. उमेदवारांनी या वेबसाइटवरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून माहिती भरावी. ऑनलाईन अर्ज पाठविण्याच्या पहिल्या भागात (पार्ट वन) मूळ माहिती भरावी. त्यानंतर सर्व भरलेल्या माहितीशी सहमती म्हणून क अॠ१ी हे बटण क्लिक करावे. नंतर नोंदणी क्रमांकाचे पान स्क्रीनवर दिसेल. या पानाची प्रिंट काढून उमेदवाराने ती घ्यावी. नंतर आयोगाशी पत्रव्यवहार करताना हाच नोंदणी क्रमांक संदर्भ म्हणून वापरावा. अर्जाचे शुल्क, छायाचित्र आणि स्कॅन केलेल्या स्वाक्षरीशिवाय रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होत नाही. याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी. अर्जाचे शुल्क नेट बँकिंग किंवा स्टेट बँक ऑफ इंडियात चलनाद्वारे भरता येईल. ज्यांना शुल्कात सवलत आहे, त्यांनी अर्ज शुल्काचे टप्पे सोडून इतर माहिती भरावी. अलीकडच्या काळातील छायाचित्र किमान १२ केबी क्षमतेचे जेपीजी फारमॅटमध्ये आणि १०० पिक्सल लांबी आणि १२० पिक्सल उंची या आकारात स्कॅन करून अपलोड करावे. स्वाक्षरीदेखील जेपीजी फॉर्मेटमध्ये १२ केबी आकारात १४० बाय ६० पिक्सल या आकारात स्कॅन करून अपलोड करावी.
ऑफलाईन अर्ज- कागदावर अर्ज भरून पाठवताना आयोगाने विहित केलेल्या नमुन्यातच अर्ज दि. ४ मार्च २००१ पर्यंत पाठवावा. विहित शुल्क सेंट्रल रिक्रूटमेंट फी स्टॅम्प्सच्या स्वरूपात अर्जावर चिकटवावे आण पोस्टातून ते दिनांकाच्या शिक्क्यासह रद्द करून घ्यावेत.
बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ आणि एसएसबीसाठी- ५ जून २०११ रोजी लेखी परीक्षा घेण्यात येईल. त्याशिवाय शारीरिक क्षमता चाचणी मार्च ते मे दरम्यान तर वैद्यकीय चाचणी जुलै-ऑगस्ट या काळात घेतली जाईल. अंतिम निकाल ३१ ऑक्टोबर २०११ रोजी जाहीर केला जाईल.
बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ आणि एसएसबीसाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता- प्रादेशिक संचालक (पश्चिम क्षेत्र), स्टाफ सिलेक्शन कमिशन, पहिला मजला, दक्षिण विंग, प्रतिष्ठा भवन, १०१, एम. के. मार्ग, मुंबई-४०००२० या पत्त्यावर पाठवावेत.
आसाम रायफल्स आणि आयटीबीपीएफसाठी- १ मे २०११ रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. शारीरिक क्षमता चाचणी मार्च ते एप्रिल या काळात तर वैद्यकीय परीक्षा जून ते जुलै २०११ या काळात केली जाईल. ३१ जुलै २०११ रोजी अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.
आसाम रायफल्ससाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता- रिजनल डायरेक्टर (एनईआर), स्टाफ सिलेक्शन कमिशन, रुक्मिणी नगर, आसाम सचिवालय, गुवाहाटी, आसाम-७८१००६.
आयटीबीपीएफसाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता- डेप्युटी डायरेक्टर (एनडब्ल्यूआर), स्टाफ सिलेक्शन कमिशन, ब्लॉक नं. ३, ग्राऊंड फ्लोअर, केंद्रीय सदन, सेक्टर-९, चंदिगड-१६००१७.
उमेदवारांसाठी हेल्पलाईन- स्टाफ सिलेक्शन कमिशन, मुंबई- ०७७३८४२२७०४, ०७७३८४२२७०५.
अधिक माहितीसाठी लॉग ऑन करा- http://ssc.nic.in किंवा www.sscnwr.org 
एकूणच स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून होणारी केंद्रीय संघटनेतील ही ‘महा’ भरती युवकांसाठी मोठी संधी ठरणार आहे. तेव्हा सज्ज व्हा, चला जिंकू या दाही दिशा...
Today, there have been 1 visitors (1 hits) on this page!
 
This website was created for free with Own-Free-Website.com. Would you also like to have your own website?
Sign up for free