sachinbhandare - दहावी, बारावी, पदवीधरांसाठी सुरक्षा दलात ह
 

Contact
sachin
time pass
marathi newspaper
websites
Career
=> दहावीनंतरचे डिप्लो
=> शैक्षणिक कर्जासाठी
=> दहावी, बारावी, पदवीधरांसाठी सुरक्षा दलात ह
=> युपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षा
=> तरुणांनो, चला, जिंकू या दाही दिशा...
आरोग्य
बँकिंग

तुम्ही दहावी उत्तीर्ण असा किंवा थेट पदवीधर असा संरक्षण सेवेतील हजारोंच्या संधी युवकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. संघ लोकसेवा आयोगाने संयुक्त संरक्षण सेवेच्या माध्यमातून 522, स्टाफ सिलेक्शन कमिशनने केंद्रीय पोलीस संघटनेत सब इन्स्पेक्टरच्या 2275 तर सीमा सुरक्षा दलात 19857 अशा हजारोंच्या संख्येतील पदे भरण्याची मोहिम सुरू केली आहे. युवा वाचकांना या हजारों संधीची माहिती देणारा हा लेख…
संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेद्वारे
अधिकारी होण्याची संधी
आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये अधिकारी पदांवर नियुक्तीसाठी संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेत निवड होणे गरजेचे असते. संघ लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी ही परीक्षा यंदा 13 फेब्रुवारी 2011 रोजी घेण्यात येणार आहे. संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेचा अर्ज भरताना उमेदवारांना आर्मी, नेव्ही आदींचा प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे. या परीक्षेसाठी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे- इंडियन मिलिटरी अकादमीसाठी-19 ते 24 वर्ष,नावल अकादमीसाठी-19 ते 22 वर्ष,एअर फोर्स अकादमीसाठी-19 ते 23 वर्ष,ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीसाठी-19 ते 25 वर्ष परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता ही सेनानिहाय वेगळी असून इंडियन मिलिटरी अकॅडमी (IMA)/ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (OTA) करिता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.,नावल अकॅडमी करिता- फिजिक्स, मॅथेमॉटिक्स विषय घेवून विज्ञान शाखेची पदवी किंवा अभियांत्रिकी शाखेची पदवी,एअर फोर्स अकॅडमी करिता- फिजिक्स आणि किंवा मॅथेमॉटिक्स विषय घेवून विज्ञान शाखेची पदवी किंवा अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक राहणार आहे.
उमेदवार शारिरीक, मानसिकदृष्टय़ा तंदुरूस्त, निरोगी ठरवितानाचा किमान उंची – 157.5 सें.मी. (वजन उंचीच्या प्रमाणात) एअर फोर्ससाठी – 162.5 सें. मी.उंची आवश्यक आहे तर महिला उमेदवारांसाठी 152 सें.मी. उंची निश्चित करण्यात आली आहे.
लेखी परीक्षा, व्यक्तिमत्व चाचणी-मुलाखत या टप्प्यातून निवड उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. लेखी परीक्षेत इंडियन मिलिटरी अकॅडमी, नावल अकॅडमी आणि एअर फोर्स अकॅडमी करिता इंग्रजी,सामान्यज्ञान,एलेमेंटरी मॅथेमॉटिक्स या विषयांसाठी प्रत्येकी 100 प्रमाणे 300 गुणांची तर ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी करिता इंग्रजी, सामान्यज्ञान विषयांची प्रत्येकी 100 प्रमाणे 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. दोन्ही पेपर्स हे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरुपाचे असून मॅथेमॉटिक्स आणि सामान्य ज्ञान हा हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये राहणार आहे. चुकीच्या उत्तरांचे गुण वजा केले जाणार असून निगेटिव्ह मार्किंग पद्धती लागू आहे.
मुंबई, नागपूर, पणजी आदी केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या वतेने ही मुलाखत घेण्यात येईल. इंडियन मिलिटरी अकॅडमी, नावल अकॅडमी आणि एअर फोर्स अकॅडमी करिता प्रत्येकी 300 गुण तर ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीसाठी 200 गुण मुलाखतीसाठी निर्धारित करण्यात आले आहे. निवडलेल्या उमेदवारांना इंडियन मिलिटरी अकादमी ,डेहराडून,नावल अकॅडमी, एझिमला, केरळ,एअर फोर्स अकॅडमी, हैदाबाद,ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई (पुरुषांसाठी),ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई (महिलांसाठी) येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेसाठी महत्त्वाचे…
 महिला उमेदवार फक्त ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीसाठी पात्र असून त्यांना अर्जात फक्त OTA चाच पहिला आणि एकच पसंतीक्रम द्यावा लागेल.
 इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना 18 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण काळात परशुरामभाऊ पटवर्धन स्कॉलरशीप आणि कर्नल केंदाल फ्रन्क मेमोरियल स्कॉलरशीप दिली जाते.
 प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आर्मी अधिकारी म्हणून संपूर्ण देशभरात कुठे ही नियुक्ती केली जाते.
 प्रशिक्षण पूर्ण केल्यानतंर लेफ्टनंट आणि त्यानंतर 2 वर्षांनी कॅप्टन, 6 वर्षांनी मेजर, 13 वर्षांनी कर्नल आदी पदांवर पदोन्नतीच्या संधी उपलब्ध आहेत.
 नेव्ही साठी निवडलेल्या उमेदवारांना नौदलाचे जहाज आणि आस्थापनांवर प्रशिक्षण दिले जाते. त्यातगोवा येथील नावल अकॅडमीत 20 आठवडयांचा नावल ओरिएन्टेशन कोर्स, 6 महिन्यांचे कॅडेट ट्रेनिंग,त्यानंतर 6 महिने दुय्यम लेफ्टनंटच्या हाताखाली अधिकारी पदाचे प्रशिक्षण त्यांनतर वर्षभराचे सब लेफ्टनंट पदाचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर उमेदवारांना अधिकारी म्हणून भारतीय नौदलाच्या जहाजावर नियुक्त केले जाते. त्यावेळी नावल वॉच किपिंग सर्टिफिकेट कोर्स पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवावे लागते.
 एअर फोर्समध्ये निवडलेल्या उमेदवारांना 74 आठवडयांचे फ्लाईंंग ब्रॅन्च (पायलट) प्रशिक्षण झाल्यानंतर फ्लाईंंग ऑफिसर म्हणून नियुक्त केले जाते. फ्लाईंंग(पायलट) ब्रॅन्च चे 10 वर्ष यशस्वीपणे पूर्ण केल्यावर स्क्वॉड्रन लीडर आणि विंग कमांडर पदावर पदोन्नतीच्या संधी आहेत.
 ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (OTA) मध्ये निवडलेल्या उमेदवारांना 11 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर 49 आठवडय़ाच्या प्रशिक्षणानंतर उमेदवारांना शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये लेफ्टनंट या पदावर सामावून घेतला जाते. या पदाचा परिविक्षाधीन कालावधी हा सहा महिन्यांचाअसतो.
 शॉर्ट सर्व्हिस कमिशन मधील या (महिला/पुरुष) अधिकाऱयांचा नियुक्तीचा कार्यकाळ हा 14 वर्षाचा असतो. त्यानंतरही इच्छा असल्यास पाच वर्षांपर्यंत मुदतवाढ मिळू शकते. त्यांना लेफ्टनंटनंतर कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल या पदांपर्यत पदोन्नतीच्या संधी आहेत.
ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज पाठविण्याची मुदत 25 ऑक्टोबर 2010 असून अधिक माहितीसाठी www.upsconline.nic.in/ntf-CDS.htm या लिंकवर लॉगइन केल्यास अधिक माहिती मिळू शकेल.
एनडीएद्वारे बारावी उत्तीर्णं युवकांना
लेफ्टनंट, कमिशन्ड ऑफिसर पदावर संधी
तीनही दलांमध्ये लेफ्टनंट, कमिशन्ड ऑफिसर आदी पदांची संधी उपलब्ध करून देणा-या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी तथा नौसेना अकादमी परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे. यासाठी 17 एप्रिल 2011 रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी साडेसोळा वर्षे (साडेसोळा) ते 19 वर्षे वयोमर्यादा असून आर्मीसाठी NDA- 10+2 पॅटर्ननुसार 12 वी परीक्षा उत्तीर्ण, एअरफोर्स- नावल शाखेकरिता NDA आणि नावल अकादमीतील 10+2 (एक्झिक्युटिव्ह ब्रॅन्च करिता) फिजिक्स आणि मॅथेमॉटिक्स विषय घेवून 12 वी परीक्षा उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता निश्चित केली आहे. 12 वी च्या परीक्षेला बसलेले विद्यार्थीही या परीक्षेला बसण्यासाठी अर्ज करु शकतात. मात्र, नंतर आवश्यकता वाटेल तेव्हा 12 वी उत्तीर्ण परीक्षेच्या प्रमाणपत्राचा पुरावा त्यांना आयोगाला सादर करावा लागेल.
या परीक्षेसाठी उंची किमान – 157.5 सें.मी. (वजन उंचीच्या प्रमाणात) एअर फोर्ससाठी – 162.5 सें. मी.उंची आवश्यक अशी शारीरिक पात्रता ठेवली आहे. लेखी परीक्षा, व्यक्तिमत्व चाचणी, शारिरीक पात्रता परीक्षा या तीन टप्प्यातून निवड केली जाणार असून मॅथेमॉटिक्स, सामान्य क्षमता चाचणी या विषयांचे अनुक्रमे 300 व 600 गुणांचे दोन पेपर राहणार आहेत. दोन्ही पेपर्स हे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरुपाचे असून मॅथेमॉटिक्स आणि सामान्य क्षमता चाचणीचा B भाग हा हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये आहे. निगेटिव्ह मार्किंग पद्धती लागू आहे.मुंबई, नागपूर, पणजी आदी परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाद्वारे उत्तीर्ण उमेदवारांची बुध्दिमत्ता आणि व्यक्तिमत्वाची चाचणी केली जाईल. लेखी परीक्षा, व्यक्तिमत्व चाचणी, शारिरीक पात्रता परीक्षेत पात्र ठरलेल्या आणि निवड झालेल्या उमेदवारांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) खडकवासला, पुणे येथे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणादरम्यान निवास, पुस्तके, गणवेष, जेवण, वैद्यकीय सुविधा शासनाकडून पुरवल्या जातात.
एनडीए परीक्षेसाठी महत्त्वाचे…
 एनडीए परीक्षेचा अर्ज भरताना अर्जातील कॉलम 17(1) मध्ये पसंतीक्रम द्यावे लागतात.या पसंतीक्रमानुसार उमेदवारांची नियुक्ती केली जाते.
 एनडीए मध्ये प्रशिक्षण घेणाऱया उमेदवारांना परशुराम भाऊ पटवर्धन स्कॉलरशीप, कर्नल केंदाल फ्रन्क मेमोरियल स्कॉलरशीप, पायलट ऑफिसर गुरुमित सिंह बेदी मेमोरियल स्कॉलरशीप एफ जी ऑफिसर डी.व्ही . पिंटू मेमोरियल स्कॉलशीप तसेचमहाराष्ट्र राज्यातील माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते.
 एनडीए च्या आर्मी ,नेव्ही, एअर फोर्से या तीन शाखंमध्ये निवडलेल्या छात्रांचे प्राथमिक अकॅडॉमिक आणि फिजिकल प्रशिक्षण एनडीए,पुणे येथे होते. ते तीन वर्ष कालावधीचे असते. प्रशिक्षण काळातील पहिले अडीच वर्षाचे प्रशिक्षण तिन्ही शाखांचे सारखेच असते त्यांनतर जवाहरलाल नेहरु विद्यापीठ दिल्ली यांचे कडून या उमेदवारांना बी.एस्सी.,बी.एस्सी (संगणक) किंवा बी.ए.ची पदवी बहाल केली जाते.
 नावल अकॅडमी मध्ये उमेदवारांना चार वर्ष मुदतीचे प्राथमिक अकॅडमिक आणि फिजिकल प्रशिक्षण नावल अकॅडमी ,एझीमला येथे दिले जाते. येथील छात्रांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर बी. टेक.पदवी बहाल केली जाते.
 एनडीए मधून उत्तीर्ण झालेले आर्मीचे छात्र डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकादमीत आणि नेव्हीचे छात्ज्ञ प्रशिक्षण कालासाठी तसेच एअर फोर्सचे छात्र एअर फोर्स अकादमी हैदाबाद येथे प्रशिक्षणासाठी पाठवले जातात.
 आर्मी छात्रंाना 1 वर्षाचे प्रशिक्षण आयएमए मध्ये पार पडल्यानंतर इन्फॉन्ट्री सबयुनिट मध्ये अधिकारी म्हणून पाठवले जाते. यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हे अधिकारी लेफटनंट दर्जाच्या पदावर नियमित सेवेत येतात.
 नेव्ही छात्रंाची नेव्हीच्या कार्यकारी ,अभियांत्रिकी आणि विद्युत शाखेत निवड केली जाते. एनडीए प्रशिक्षणानंतर सहा महिन्यांचे सागरी छात्र प्रशिक्षण काळ यशस्वीरित्या पूर्ण केल्यांनतर मिडशिपमेन दर्जाचे पद दिले जाते. सहा महिन्याच्या प्रशिक्षणानंतर उप कार्यकारी (सब ऑक्टिंग) लेफटनंट या पदावर नियुक्ती करण्यात येते.
 एअर फोर्स छात्रांना दीड वर्षाचे फलाईंंग प्रशिक्षण दिले जाते. त्याचवेळी 1 वर्षाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात फलाईंग ऑफिसर म्हणून आणि त्यांनतर यशस्वी पणे सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर एक वर्ष प्रोबेशन कालावधीत पर्मनन्ट कमिशन्ड ऑफिसर म्हणून नौदलाच्या सेवेत सामावून घेतले जाते. निवडलेल्या उमेदवारांना वेतनश्रेणी व इतर भत्ते दिले जातात.

केंद्रीय पोलीस संघटनेत फौजदार व्हा
2275 पद भरतीची प्रक्रिया सुरू
सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, इंडो- तिबेट सीमा पोलीस, सशस्त्र सीमा दलामध्ये 2275 उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर) पदांची भरती केली जाणार असून पदवीधर उमेदवारांना ही मोठी संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे 12 डिसेंबर 2010 रोजी सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन परीक्षा-2010 घेण्यात येणार आहे. यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा दलामध्ये महिलांना संधी मिळणार आहे. या परीक्षेसाठी 20 ते 25 वर्ष वयोमर्यादा असून लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. लेखी परीक्षेत पेपर 1 मध्ये चार उपप्रकार असून 200 गुणांची प्रश्नपत्रिका असेल. पेपर 2 हा इंग्रजी भाषा आणि सारांशलेखनाचा असून 200 गुणांची त्यासाठी प्रश्नपत्रिका असेल. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी आणि हिंदी-इंग्रजी भाषेतून असून मुलाखत (व्यक्तिमत्व चाचणी) 100 गुणांची राहणार आहे.
पेपर 1 मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारिरीक क्षमता चाचणी घेतली जाणार असून त्यात पुरूष- 100 मीटर धावणे 16सेकंद, 1.6 कि.मी. साडेसहा मिनिटात धावणे, लांब उडी- 3.65 मीटर, उंच उडी- 1.2 मीटर, गोळा फेक- 4.5 मीटर्स. महिला- 100 मीटर 18 सेकंदात धावणे, 800 मीटर 4 मिनिटामध्ये धावणे, लांब उडी – 2.7 मीटर, उंच उडी 0.9 मीटर या चाचण्यांचा समावेश आहे. मुलाखतीनंतर गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल. त्याशिवाय केंद्रीय पोलीस संघटनेत सहायक पोलीस उपनिरीक्षकांचीही पदे भरली जाणार असून त्यासाठीही उमेदवारांना अर्ज करता येईल.
अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत 2 नोव्हेंबर 2010 आहे. अधिक माहिती http://ssc.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सीमा सुरक्षा दलात 19857 जवानांची भरती
सीमावर्ती भागातील गुन्हेगारीचाच नव्हे तर सीमा भागातील दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी बीएसएफची यंत्रणा कार्यरत आहे. त्याशिवाय देशाच्या विविध भागातील बंडखोर आणि अतिरेक्यांपासून देशाच्या संरक्षणाचं काम हे दल करीत असतं. बीएसएफच्या मैत्रीचा मानवी चेहरा लाभला असल्यामुळे संकटप्रवण क्षेत्रातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून जनतेला भयमुक्त करण्याचं काम देखिल हे दल करतं. सीमा सुरक्षा दलात 19857 कॉन्स्टेबलची पदे भरली जाणार असून त्यात 1271 पदे महाराष्ट्रासाठी आहेत.
कॉन्स्टेबलसाठी दहावी उत्तीर्ण ही अर्हता असून 18 ते 23 वर्ष वयोमर्यादा आहे. शारीरिक पात्रतेमध्ये 165 से.मी उंची आवश्यक असून छाती 78 सें.मी आणि फुगवून 83 से.मी. इतकी असणे आवश्यक आहे. कॉन्स्टेबल निवडीसाठी प्रथम शारिरीक क्षमता चाचणी घेतली जाईल त्यात 1 मैल धावणे, 11 फूट लांब उडी आणि 3.6 फूट उंच उडी या चाचण्यांचा समावेश राहणार असून त्यात उत्तीर्ण झालेल्यांची लेखी परीक्षा घेतली जाईल. ती 100 गुणांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल.यात उत्तीर्ण उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल, त्यात उमेदवाराचा प्रतिसाद, बुद्धिमत्तेचा सामान्य स्तर आदीं बाबी तपासल्या जातील. एनसीसी किंवा आयटीआयधारक तसेच राष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंना बोनस गुण दिले जातात. कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज पाठविण्याची मुदत 3 नोव्हेंबर 2010 असून हे अर्ज जिल्हा स्तरावरील सर्वच पोस्ट कार्यालयांमध्ये विक्रीस उपलब्ध आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या http://bsf.nic.in/ या संकेतस्थळावर लॉग ऑन केल्यास अधिक माहिती उपलब्ध होईल.
एकूणच, संयुक्त संरक्षण सेवा, एनडीए, स्टाफ सिलेक्शन कमिशनची केंद्रीय पोलीस संघटना परीक्षा, सीमा सुरक्षा दलातील भरतीच्या माध्यमातून राज्यातील युवकांसाठी हजारो संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या संधीला कवेत घेण्यासाठी महाराष्ट्रातील तरूणांनी कसून तयारी करण्याची आवश्यकता असून असे झाल्यास संरक्षण क्षेत्रात मराठी टक्का वाढेल, हे निश्चित !
Today, there have been 4 visitors (7 hits) on this page!
 
This website was created for free with Own-Free-Website.com. Would you also like to have your own website?
Sign up for free